Tuesday, May 6, 2008

गडहिंग्लज

परवा बरेच दिवसांनी गडहिंग्लजला जाण्याचा योग आला. गडहिंग्लज हे काही माझं गाव नव्हे, तिथे माझी अतिशय लाडकी आणि प्रेमळ अशी आत्या राहते. अगदी लहान असल्यापासून कोणी कधीही गडहिंग्लजला जाउया म्ह्टलं की मी एका पायावर असे. लहानपणी मी आणि माझा मोठा भाऊ मे महिन्याच्या सुट्टीत नेहमी गडहिंग्लजला असा़यचो. लहानपणीच्या मे महिन्याच्या सुट्टीच्या आठवणी तर अजूनही डोळ्यासमोर फेर धरून नाचतात . मी माझा मोठा भाऊ , 4 आत्ये बहिणी 2 आत्ये भाऊ आणि चुलत भाऊ बहिण असा आमचा मोठा ग्रुप एकत्र असे. आत्याची सगळ्यांवर फार माया आणि मुलांचंही आत्यावर अतिशय प्रेम । अजूनही आत्या अगदी आवर्जून त्या आठ्वणी काढते तेव्हा हसून हसून पोटात दुखायाला होता। एक पांडूमामांचा (आत्या चे मिस्टर ) सोडला तर कोणाला बाकी ईतर कही धाक नसे. पण पांडूमामाही मोठे विनोदी. मूड मध्ये असले की हसवून पूरेवाट करुन सोडायचे . त्यांचा रागीटपणा त्यांचे सिगरेट/बीडी चे व्यसन सुटल्यावरच काय तो कमी झाला.

आमचं गडहिंग्लजचं घर तसं ऐन मोक्याच्या ठिकाणी बाज़ारपेठेत आहे। समोर गुजर , शेजारी बेल्लत , दुंडगे इत्यादी विसंवादी मंडळी राहायची. पांडूमामा ह्या सर्व घराच्या मलाकांना एकेरी नावाने हाक़ मारायचे (ए अरण्या वगैरे... ) आख्या बाज़ारपेठेत पांडूमामांच्या वाटेला जायची कोणाची हिम्मत नसे. समोर गुजरांच्या घरातले डोक्यानी अंमळ अधू असलेले शांतू काका आम्हा मुलांची हसायची निराळीच सोय करून द्यायचे. गल्लीच्या एका टोकाला पीर दर्गा होता. त्याशेजारी सायकल चे दुकान (इथे लहान मुलांसाठी सायकल भाड्यानी मिळायाच्या , २५ पैसे १ तास) . सायकल च्या दुकानाच्या मागे सुभाष टॉकिज. ह्या थिएटर चा मालकही पांडुमामांचा मित्र होता (रमण्या ). घरी कंटाळा आला की पांडुमामा तडक हातात भडंगाची पिशवी घेउन सरळ टॉकिज मध्ये जाऊन बसत असत. ह्या मध्ये त्यांच्या फ़िल्म च्या शौकबद्दल गैरसमज करू नए. भडंग संपल्या संपल्या ते तड़क घरी निघून येत. "ऊरलेला पिक्चर बघतोय की तो रमण्या" हे त्यांचं आपलं नेहमीचं उत्तर असे. (ह्या टॉकिज़ मध्ये पूर्वी काही लोकांनी "बोम्बे टू गोवा " हा पिक्चर ८ दिवस पाहिल्याच्या कथा आहेत. दररोज लाईट्स जात असत आणि पिक्चर फक्त अर्धाच रहात असे, शेवटी एकदा आठव्या दिवशी काय तो पिक्चर संपला. ८ दिवसांपर्यंत दररोज लोकांच्या हातावर शिक्के मारले जायचे आणि दुस-या दिवशी ते हात दाखवून दररोज लोक परत थिएटर मध्ये हजर व्हायचे.)

हे झालं आमच्या गावातल्या घराबद्दल , गडहिंग्लज च्या शेताताही आमचे एक घर आहे (ह्या घराच्या आठवणी तर काय सांगाव्या ?) जेमतेम २ खोल्यांचं काय ते घर आहे। घरात एक चूल, एक कॉट अणि काही खुर्च्या वगैरे सामान. तेव्हा शेतात वीज आली नव्हती. सर्व पोरांना ७ वाजल्यावर अंधार झाला की कम्पल्सरी झोपावे लागे आणि मग पहाटे ५ ला आपल्या आपण जाग येई. पोरांना अतिशय आनंददायी असे ते घर होते. घरात २ मांजरी होत्या आणि त्यांची ४-५ पिल्लांची पिल्लावळ. घराबाहेर गोठ्यात म्हैस आणि रेडकू. (ज्या लोकांना धारोष्ण हा शब्द केवळ ऐकून माहित आहे किंवा ऐकूनही माहित नाही अशा लोकांसाठी सांगायची गोष्ट म्हणजे की मी डायरेक्ट धार तोंडात घेऊन प्यायलो आहे. सुनिल दादा मला ऊलटं करून पक़डत असे आणि मी पहिल्या धारेची पीत असे.) आम्ही म्हशीला चरायला नेत असू (बरेचदा म्हशीच आम्हाला फरफटत नेत.) म्हशीच्या पाठीवर बसण्याच्या पैजा लावणे, त्यासाठी झाडावरुन म्हशीच्या पाठीवर उड्या मारणे असे बरेचसे खेळ होत. शेताच्या चारही बाजूने आंब्याची झाडे होती. ऊत्कृष्ट असा केशरी हापूस आंबा मी ईथे अगदी पोट फुटेस्तोवर खाल्ला आहे. झाडावर चढून आंबे काढणे, मोठ्या आंब्याच्या झाडाला झोपाळा बांधणे, एक ना दोन असे हजार उद्योग चालू असत. ह्या सगळ्यात पुढे असणारा माझा मोठा चूलत भाऊ मह्या होता.त्याच्या गंमती जमती सांगायाला तर मला दुसरा ब्लॉग लिहावा लागेल. शेतात सुटलेला वारा , गारांचा पाऊस, पायाला चिकटून तयार झालेले चिखलाचे बूट इत्यादी आठवणी तर आजही मी अगदी व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत.

अशा ह्या गडहिंग्लज ला परवा बरेच दिवसांनी जाण्याचा योग आला। जाऊया जाऊया म्हणता म्हणता बरेच दिवस जायचे राहुनच गेले होते. एक तर लग्नानंतर एकदाही गडहिंग्लजला गेलो नव्हतो आणि शिवाय आता जास्त दिवस अमेरिकेला जाणार असल्यामुळे त्याआधी आत्याला भेटून जावे म्हणून गडहिंग्लजला निघालो. सावंतवाडीहून सकाळी लवकर निघालो, निसर्गरम्य आम्बोली घाट , जर का बस मधून सर करायचा असेल तर सकाळीच निघावे. ह्या घाटाने भल्याभल्यान्ना "गाड़ी लागणे" हा वाक्प्रचार ञात करून दिला आहे.

साधारणपणे सकाळी ९ ला गडहिंग्लजला पोचलो। स्टॅंण्ड वर उतरताच गडहिंग्लज अजुनही आहे तसं आहे हे पाहून हायसं वाटलं. राज्य परिवहन मंडळाच्या कॅंटीन पासून ते अगदी स्टॅंड च्या मागच्या गेट पर्यंत सगळं काही 'जैसे थे ' होतं. सुनील दादा ला फ़ोन केला. तो आणि तेजु , ऋतुजा स्टॅंड च्या जवळंच होते, ते पटकन आले. रिक्शा करून घरी निघालो. रवीवारचा दिवस होता , छोटे मोठे व्यापारी रवीवारच्या बाजारची तयारी करत होते. जाता जाता गडहिंग्लजची चौपाटी आणि लायब्ररी लागली (लायब्ररी समोर "साने गुरूजी" नुकतीच रात्र पाळी संपवून बसले होते आणि आम्बेडकर उभे राहिले होते.) सर्वत्र कसं प्रसन्न वातावरण होतं. आजुबाजुच्या गावातल्या बायका 'पिवळे शाडुचे दगड', भाजीपाला, हळद कुंकू विकायाला आल्या होत्या.


रिक्शा सुभाष रोड वरून गल्लीतून आत जाऊ लागली , कोप-यावरचे बी बीयाणे आणि खतांचे दुकानही होते तसेच होते। त्यातले परमानेंट झालेले आणि डोक्यावर पोतं घेउन इकडे तिकडे करणारे कामगार सुध्हा अगदी माझ्या लहानपणी होते तसे होते. लगेच पुढे ते प्रसिद्ध सायकल चे दुकान लागले. एक शटर उघडे ठेऊन त्या छोट्याशा दुकानात चौकोनी स्टूलावर बसून पेपर वाचणारा तो स्थितप्रध्न्य ही जसाच्या तसा होता. समोर पडलेल्या गुडघ्या एवढ्या उंचीच्या सायकली , डोळ्यावर चौकोनी चष्मा आणि अंगावर नीळे कपडे. अगदी पिक्चर परफेक्ट !!! ह्या सगळ्यात एकच गोष्ट काय ती मिस्सींग होती ती म्हणजे हीरो पिक्चर मधल्या "नींदिया से जागी बहार ...." चे सूर.(गेली कित्येक वर्ष हा माणूस ती गाणी न थकता दररोज ऐकतो आहे....) मी मनात म्ह्टलं "अरेरे बिचा-याकडे एकच कॅसेट होती ती शेवटी एकदा घासून घासून संपली वाटते. आपण आता ह्यांना नवीन कॅसेट विकत घेउन द्यावी". पण दुस-याच क्षणी सुनिलदादानी रहस्याचा उलगडा केला. "अरे त्याच्या शेजारी ते इलेक्ट्रिक चं दुकान होतं ना ते शॉर्ट सर्किट मुळे जळुन गेलं" (मला मात्र इतकी वर्षं वाटायचं की तो सायकलवालाच गाणी लावायचा म्हणुन , अरेरे बिच्चारा !!! )

पुढे जाता जाता नेहमीच्या त्या घराच्या दारात "वेडी राणी" सुद्धा तश्शी उभी होती। रिक्शा थांबली आणि घरात गेलो. आत्यानी दारातच थांबवून जोडीनी ओवाळलं, पायावर पाणी घातलं. आम्ही आत्याचा पाया पडलो आणि घरात गेलो. आत्त्याच्या उत्साह आजही जसाच्या तसा आहे. जसे पूर्वी आम्ही असायचो तशी आता तेजू अणि रुतुजा मध्ये ती रमून गेली आहे. तिला लहान मुले अगदी मनापासून आवडतात आणि म्हणुनच नेहमी तिच्याजवळ लहान मुले असतात (तेजू अणि रुतुजाच्या आधी माझे भाचे विक्रम अणि अनिरुद्ध होते. त्यांच्या आधी आम्ही !! )

स्वैपांकघरात आत्याबरोबर गप्पा मारत बसलो। आत्यानी जुन्या आठवणी काढल्या आणि आम्ही दोघेही पोट धरून हसलो. काजल मात्र थोडी बुचकळ्यात पडली. तेजू, रूतुजा दोघीही गोंधळ घालत होत्या. तेवढ्यात जयुआक्काचा फोन आला. तिच्याकडे जायला निघालो. शिवाजी बॅंकेकडुन पुढे जात लगेचच तिच्या घरी पोचलो. कुलकर्णी सर 'MS CIT' चा अभ्यास करत बसले होते. ती संधी पाहून पटकन तिकडून निसटलो. त्यांची कार घेऊन मी, सुनिलदादा, काजल, तेजु आणि रुतुजा शेतावर गेलो. पुर्वी चालत जायचो ते आठवलं आणि आता कार असल्याचं खरंच बरं वाटलं. आता तर कार अगदी शेतापर्यंत जाते. (पुर्वी ओढ्यात पाणी भरलं की शेतात जाता येत नसे.)


शेतातलं घर पाहिलं, पुर्वी हेच घर आपल्याला केवढं मोठं वाटायचं ह्याचं आश्चर्य वाटलं। आता त्यात शेतकरी राहतो. शेतातल्या ऊन्हात फिरून आल्यावर त्या घरात जो काही गारवा जाणवाय़चा तो पुन्हा तसाच जाणवला. शेतात मात्र आंब्याची झाडं बरीचशी वठली होती, फक्त चिंचेची झाडं तेवढी शिल्लक राहीली आहेत. शेतकरी बुवा आपले रेग्युलर शेतक-यांसारखेच होते.


शेतात फिरत फिरत काजलला विहिर , शेतातले देऊळ , लोणच्याच्या आंब्याचं झाड , जांभळाचं झाड, ओढा वगैरे ठिकाणे आणि त्यांच्याशी निगडीत गोष्टी सांगून झाल्या। (ऊषी आक्का झाडावरून कशी पडली, माकडं नक्की कुठे यायची वगैरे वगैरे). भरपूर फोटो काढुन घेतले.


शेतातलं आटपून घरी आलो , जेवलो आणि डोक्याखाली जमखाना घेवुन मस्तपैकी माजघरात ताणून दिली। (ऊच ऊच घागर आणि डोक्याला जमखाना !! ह्यालाच म्हणत असावे.)


संध्याकाळी ऊठून पुन्हा जयुआक्काकडे गेलो, सर आणि त्यांचे शिक्षक त्या 'MS CIT' च्या जाचातून मोकळे झाले होते. मस्तपैकी गप्पा टप्पा रंगल्या. विक्रमचे लहानपणीचे प्रताप ("वरबाडतंय म्हणून सांगितलं होतं की नाही ?" ईति अनिरूध्द) आठवून झाले. आम्ही एक दिवस थांबून मगच जावं असा सरांचा आग्रह होता. पण राहणं अगदीच अशक्य होतं, बॅंगलोर ला बरीच कामं अर्धवट राहिली होती. परत यायला निघालो. गडहिंग्लजहून परत निघताना जशी लहानपणी हुरहुर वाटायची तशी आजदेखील वाटली......







गडहिंग्लज

परवा बरेच दिवसांनी गडहिंग्लजला जाण्याचा योग आला. गडहिंग्लज हे काही माझं गाव नव्हे, तिथे माझी अतिशय लाडकी आणि प्रेमळ अशी आत्या राहते. अगदी लह...